केम–ढवळस रस्त्यावर कार्पेट टाकण्याची प्रहार संघटनेची मागणी

केम(संजय जाधव): केम–ढवळस–कुर्डूवाडी हा महत्त्वाचा मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून कार्पेट टाकावे, अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

तळेकर यांनी पत्रात नमूद केले आहे की केम–ढवळस हा रस्ता कुर्डूवाडीला जाण्यासाठी जवळचा व जीवघेणा बनलेला मार्ग असून अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या व खोली वाढली आहे. या मार्गावरून ऊस वाहतुकीची मोठ्या प्रमाणात ये–जा सुरू असताना रस्त्याची दुर्दशा पाहता ट्रॅक्टर–ट्रॉली घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी, शालेय विद्यार्थी, व्यापारी तसेच केमहून कुर्डूवाडीला जाणारी सर्व वाहने याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती ही तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रस्त्याचे काम त्वरित हाती न घेतल्यास प्रहार संघटना त्यांच्या पद्धतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही तळेकर यांनी दिला आहे.



