प्रकाश शेरे यांची पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुक्यातील कुंभारगाव–दिवेगव्हाण येथील ग्रामविकास अधिकारी प्रकाश नामदेव शेरे यांची करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नतीवर निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी २५ ऑगस्ट २०२५ रोजी या नियुक्तीचा आदेश जारी केला. शेरे यांनी तब्बल ३६ वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावली असून, त्यांनी उत्तर सोलापूर, भोसे, मोरवड, पिंपळवाडी, हिवरवाडी, दिवेगव्हाण, कुंभारगाव, पांडे आदी गावांमध्ये काम करताना उत्कृष्ट सेवा दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेचा “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार” त्यांना यापूर्वीच प्रदान करण्यात आला आहे.
या पदोन्नतीनंतर त्यांना विस्तार अधिकारी म्हणून १ वर्ष ९ महिने सेवा करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्या करमाळा तालुक्यात त्यांनी आपली कारकीर्द घडली, त्याच तालुक्यात पदोन्नतीवर काम करण्याची संधी मिळाल्याने ही निवड अधिक खास ठरली आहे.
श्री. शेरे यांच्या निवडीचे ग्रामसेवक संघटना तसेच विविध ग्रामस्थांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .



