विधवा महिलांना मकर संक्रातीला हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मान करावा – प्रमोद झिंजाडे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – विधवा महिलांना मकर संक्रातीला हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मान करावा असे आवाहन विधवा महिला सन्मान अभियानाचे जनक व महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी प्रेस नोट द्वारा केले.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, समाजामध्ये अजूनही विधवा महिलांना पतीच्या निधनानंतर कुठल्याही शुभ कार्यामध्ये सहभागी करून घेतले जात नाही. म्हणजेच मरेपर्यंत तिला वाळीत टाकले जाते. परंतु हेरवाड पॅटर्न नंतर महाराष्ट्रात अनेक अनेक गावात ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी ठराव झालेले आहेत. नुसते ठराव करून प्रश्न मिटत नाही तर प्रत्यक्षात कृतीमध्ये रूपांतर झाले तर परिवर्तन होते. मात्र काही गावांनी आणि काही कुटुंबानी पतीच्या निधनानंतर पत्नीच्या अंगावरील दागिने काढणे, कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे या प्रथेला विरोध करून विधवा प्रथेला हद्दपार केलेले आहे. ही घटना खूप समाधानकारक आहे. काही गावांनी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी दिवशी विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण देखील केलेले आहे. काही कुटुंबांनी गुढीपाडव्या दिवशी विधवा महिलाच्या हस्ते गुढ्या उभा केलेल्या आहेत. तसेच लग्न कार्यामध्ये देखील महिला महिलांना सन्मान दिलेला आहे.
दरवर्षी मकर संक्राती दिवशी देखील हळदी कुंकाचा कार्यक्रमात विधवा महिलांना सन्मान दिलेला आहे. मात्र ही प्रगती अजून गतिमान होण्यासाठी येत्या मकर संक्राती दिवशी महाराष्ट्रातील सर्व विधवा महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त सहभागी करून घेऊन त्यांचा सन्मान करावा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी.