अपंगत्व झुगारून प्रसादचा पीएच.डी साठी प्रवास सुरू – मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी झाली निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील प्रसाद दत्तात्रय चेंडगे याची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पीएच.डी च्या अभ्यासक्रमासाठी नुकतीच निवड झाली आहे. या पीएच.डी च्या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या आठ जागांमधून प्रसादची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागासाठी प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
मागच्या वर्षी काही पॉईंटने प्रसादची ही संधी हुकली होती परंतु पुन्हा नव्या जोमाने प्रसादने तयारी करत हा प्रवेश त्याने मिळविला. प्रसाद हा दिव्यांग असून त्याला 50% अपंगत्व आहे. शारिरिक मर्यादा असताना सुध्दा प्रसादने मिळविलेल्या या यशामुळे त्याचे व परिवाराचे करमाळा तालुक्यातील मित्र-परिवाराकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
प्रसादने पदवीचे (B.Sc.) शिक्षण कृषी महाविद्यालय, पुणे येथुन तर पदव्युतर (M.Sc.) शिक्षण दापोली विद्यापीठामधून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले आहे.प्रसादचे वडिल दत्तात्रय बाळू चेंडगे सध्या जेऊर पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमास्टर या पदावर कार्यरत आहेत, तर आई उमादेवी या गृहिणी आहेत.
माझ्यावर निसर्गाकडून जरी अन्याय झाला असला तरी माझे आई, वडील, मोठा भाऊ तुषार, वहिनी, माझे नातेवाईक व मित्र परिवार या सर्वांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळे मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व आता पीएचडी मिळवून माझ्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करेल असा आत्मविश्वास प्रसादने यावेळी व्यक्त केला.
लहानपणापासून आम्हाला प्रसादची काळजी होती. परंतू त्याच्यात असलेली शिकण्याची जिद्द, काहीतरी करून दाखविण्याची तळमळ, चिकाटी, याच बरोबर आई-वडिलांचे संस्कार यामुळे दिव्यांग व्यक्ती सुध्दा काय करू शकतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण प्रसादने सर्वांसमोर ठेवले आहे व ईतर दिव्यांगांसाठी प्रेरणादायी आहे.
– तुषार चेंडगे (प्रसादचा मोठा भाऊ)

