प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा करमाळ्यात निषेध व्यक्त

करमाळा (दि.१५): संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करत काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर घटनेचा सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयात तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी मराठा व बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निषेध निवेदन करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.

काय आहे प्रकरण?
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते. त्यावेळी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर शाई फासत धक्काबुक्की केली. यानंतर पोलिसांनी दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. संघटनेचे नाव ‘संभाजी ब्रिगेड’ हे बदलून ‘छत्रपती संभाजी ब्रिगेड’ असे नाव करावे, या मागणीसाठी ही शाईफेक करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला आहे.

करमाळा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन समाजातील तरुणांना उद्योगाची वाट दाखविणारी पुरोगामी विचारांचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्थ आहे. प्रवीणदादा गायकवाड यांना धक्काबुक्की करणे, हाताने मारहाण करणे गाडीवर दगडफेक करणे व जीवे मारण्याचा प्रयत्न करणे ही निंदनीय आहे. आरोपीवर तात्काळ मोक्कांतर्गत व तडीपार सारखे कलम लावून कारवाई करण्यात यावी. तसेच काळामध्ये प्रवीण गायकवाड यांना गृहमंत्रालयाकडून संरक्षण द्यावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी सकल मुस्लिम समाज सकल धनगर समाज व आंबेडकरवादी चळवळ करमाळा भीम आर्मी रासप बहुजन संघर्ष सेना आदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी मोठमोठ्याने घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला व करमाळा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



