करमाळ्यात व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील ‘ग्रुप ॲडमिन’चा अटकपूर्व जामीन मंजूर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१५) : ‘करमाळा समाजकारण’ या व्हॉटस्अप ग्रुप वर दोन समाजात तेढ निर्माण होईल; अशी पोस्ट टाकल्याचे पोलीसांच्या लक्षात येताच ग्रुप ॲडमीन व पोस्ट टाकणाऱ्यावर पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ग्रुप ॲडमिन नितीन आढाव यांना बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
सदर ग्रुपचे ॲडमिन नितीन आढाव पाटील यांचे सह शाम परशुराम सिंधी या दोघांवर करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, या प्रकरणी श्याम परशुराम सिंधी यांना अटक करण्यात आली आहे. तर यातील ग्रुप ॲडमिन नितीन आढाव यांनी ॲड.निखिल पाटील व ॲड.सुहास मोरे यांचे मार्फत अटकपूर्व जामीन मिळणे कामी अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांच्यासमोर झाली, सदर जामीन अर्जाचे सुनावणी वेळी ॲड.निखिल पाटील यांनी यातील ग्रुप ॲडमिन नितीन आढाव यांनी कोणतीही आक्षेपार्य पोस्ट केलेली नसून, त्यास कोणताही दुजोरा दिलेला नाही तसेच त्यांना सदर घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी श्याम सिंधी यांना ग्रुप मधून रिमूव केलेले आहे.
तपास कार्यात मदत करण्यास तयार असून, त्यांना अटक करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून नितीन आढाव यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲड.निखिल पाटील, ॲड.सुहास मोरे व ॲड.दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले

