सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना – ३१ मार्चपर्यंत मुदत

करमाळा(दि.२६): सुशिक्षित तरुण- तरुणींसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. त्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना इंटर्नशिपची संधी मिळणार असून, ही योजना सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य वृद्धीसाठी व रोजगाराच्या संधीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुण- तरुणींना सुरवातीला योजनेच्या वेबसाइटवर स्वत:चे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.
योजनेच्या अंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार आहे. या सोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. तसेच इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एकरकमी अनुदान देखील त्या तरुण-तरुणींना दिले जाणार आहेत. याशिवाय भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील असणार आहे. देशभरातील ५०० नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘या’ वेबसाइटवर करता येईल अर्ज
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना इंटर्नशिपची संधी मिळण्यासाठी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
इंटर्नशिप योजनेबद्दल ठळक बाबी…
- देशातील १२ नामांकित कंपन्यांमध्ये ५०० महिने नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी
- वयोगट २१ ते २४ च्या तरुण-तरुणींना घेता येईल प्रशिक्षण योजनेचा लाभ
- पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेल्या युवकांनाच घेता येईल सहभाग
- दरमहा आर्थिक सहाय्यता म्हणून ५००० रुपये आणि एकरकमी सहाय्यता म्हणून मिळतील सहा हजार रुपये





