मुख्याध्यापिका सुनिता मोहिते यांचे उपचारादरम्यान निधन
करमाळा(दि.३) – करमाळा येथील नवभारत इंग्लिश मेडिअम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्सच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहिते यांचे १ नोव्हेंबर रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लीनिक मध्ये उपचार घेत असताना निधन झाले.
सुमारे १ महिन्यापूर्वी, आगीच्या दुर्घटनेत त्या गंभीरपणे भाजल्या होत्या. सुरुवातीला अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे अनेक दिवसांच्या उपचारानंतर मागच्या बुधवारी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी रुग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी (दि.१ नोव्हेंबर) उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. करमाळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर करमाळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व. सुनीता मोहिते या नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सुमारे वीस वर्षांपासून कार्यरत होत्या. गेल्या 16 वर्षांपासून त्या मुख्याध्यापिका या पदावर त्या काम करत होत्या. आपल्या कार्यकाळात शाळेमध्ये त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध सांस्कृतिक व आधुनिक उपक्रम राबविले. त्यांना यश कल्याणी संस्थेमार्फत आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
मोहिते मॅडम यांच्या जाण्याने नवभारत इंग्लिश स्कूलचे अगणित असे नुकसान झालेले आहे. नवभारत इंग्लिश स्कूलला मोठ करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. शाळेत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात त्या सदैव उत्साही व तत्पर असायच्या. त्यामुळे मी शाळेच्या प्रगतीबाबत व दर्जाबाबत निश्चिंत असायची. मोहिते मॅडम कायम आमच्या स्मरणात राहणार आहेत.
- सौ सुनीता कन्हैयालाल देवी, संचालिका, गिरधरदास देवी प्रतिष्ठान, करमाळा
नवभारत इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि आदर्श शिक्षिका मोहिते मॅडम यांच्या अकाली जाण्याने करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची हानी झालेली आहे.
- गणेश करे पाटील, यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा