देवदर्शनाआधी चिखलयात्रा! ऊत्तरेश्वर मंदिर मार्गाची चिखलाने दयनीय अवस्था

केम(संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून मैदानात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. या रस्त्यावरील पाणी त्वरित काढून मैदानावर मुरूम टाकावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

श्री ऊत्तरेश्वर हे केम गावाचे जागृत ग्रामदैवत असून, या देवस्थानाला बाहेरील गावांतूनही मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि मंदिर परिसरात भव्य विवाह कार्यालय असल्याने येथे अनेक बाहेरील विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र, चिखल व अस्वच्छतेमुळे येथे आलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे “गावचे लोकप्रतिनिधी नेमके काय करत आहेत?” असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत.


या मंदिरासमोर असलेल्या मैदानात प्रत्येक रविवारी बाजार भरतो. विक्री करणारे व्यापारी अक्षरशः चिखलात बसून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे चिखलावर बसणारे डास मिठाई व अन्य खाद्यपदार्थांवर बसतात, ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.

सदर बाजार भरवले जाणारे मैदान हे देवस्थानच्या मालकीचे असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाजारासाठी देवस्थानने परवानगी दिली आहे. मात्र, बाजारकर ग्रामपंचायत वसूल करते. त्यामुळे मैदानाची स्वच्छता ग्रामपंचायतीनेच करावी, अशी मागणी भाविक व स्थानिक नागरिकांतून होत आहे.

बाजारतळ मैदान हे देवस्थानच्या मालकीचे असून, ग्रामस्थांच्या हितासाठी देवस्थानने बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बाजारकर ग्रामपंचायत वसूल करत असल्याने मैदानाची देखभाल व स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.
● विजय तळेकर,सदस्य, श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट, केम


