दसरा मेळाव्याला नारायणगडला जाण्याऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांना प्रा. झोळ यांनी दिले इंधन
करमाळा (दि.१४) – मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे दसरा मेळावा आयोजित केला होता. या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी व जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यावतीने करमाळा तालुक्यातील मराठा समाजातील बांधवांच्या वाहनास डिझेल देण्यात आले. सुमारे ५०० वाहनांसाठी इंधन दिल्याची माहिती प्रा. रामदास झोळ यांनी माध्यमांना दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयरेची अंमलबजावणी करुन सरकारने न्याय द्यावा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजबांधवाबरोबर अनेक बहुजन बांधव जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईत खारीचा वाटा उचलावा या भावनेतून म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत करण्याच्या भावनेने मी हे काम केले आहे.
याआधी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देऊन मुंबईला जाण्यासाठी तीनशे वाहनांच्या मोफत इंधन देण्याचे काम केले होते त्याचबरोबर सोलापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शांतता रॅली काढण्यात आली.याकरीता करमाळा तालुक्यातील समाज बांधवांना जाण्यासाठी अडीचशे चार चाकी व शंभर दुचाकी गाड्यांना मोफत इंधन देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत सहभागी होऊन दातृत्वाने मोफत इंधन देण्याचे काम करणाऱ्या प्रा.रामदास झोळ यांचे मराठा समाजाकडून कौतुक होत आहे.