जनतेच्या आग्रहास्तव ही निवडणूक मी लढवत आहे – प्रा. रामदास झोळ
करमाळा (दि.५) : करमाळा तालुक्यामध्ये रस्ते, पाणी, वीज याबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग निर्मिती करून सर्वांगीण विकासासाठी आपण जनतेच्या आग्रहास्तव ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा संघटक हरिभाऊ मंगवडे , पांडुरंग झोळ साहेब, लालासाहेब जगताप सर, मांगी गावचे उद्योजक प्रशांत बागल, शिवसेना अध्यक्ष कुर्डूवाडी संतोष बागल, करमाळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी तालुकाप्रमुख जितेंद्र सुरवसे तसेच करमाळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख लक्ष्मण यादव, करमाळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कुंभारवाडा शाखा अध्यक्ष सागर परदेशी, सलीम शेख, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष गफुर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, प्रा. राजेश गायकवाड, वाशिंबेचे माजी सरपंच अनुरथ झोळ, भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापू गायकवाड, भीमराव ननवरे, संजय जगताप सर, उपस्थित होते.
करमाळा विधानसभा निवडणूक मतदार संघाच्या उमेदवार निश्चित झाल्यानंतर अंतिम निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कालच्या शेवटच्या दिवशी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून निवडणूक लढवण्याविषयी प्रा. रामदास झोळ सर यांचे नाव सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रक्रमावर होते. करमाळा तालुक्यातून मराठा समाजातील ०४ उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी एका इच्छुक मनोज जरांगे पाटील यांच्या समोरच पाठिंबा जाहीर केला होता. तर बाकीच्या दोघा उमेदवारांनी माघार घेऊन प्रा. रामदास झोळ सर यांच्या नावाला पाठींबा दिला होता. मात्र मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवाराचा निवडणूक लढवण्या विषयी आढावा घेतल्यानंतर एका मतदारसंघांमध्ये १० ते १५ उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. या उमेदवारांनी आपापसात एक मत करावे, मला फायनल आपला उमेदवार सांगा अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. परंतु मराठा समाजातील उमेदवारांमध्येच आपापसात एकमत न झाल्याने समाजाची मत विभागणी होऊन समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये, मराठा समाज निवडणुकीच्या निमित्ताने विभक्त होऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे झोळ यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्री. झोळ म्हणाले की, करमाळा तालुक्यात आपण शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून मराठा समाजाबरोबरच बहुजन बांधवांना न्याय देण्याचे काम केले असून करमाळा तालुक्यामध्ये गेल्या ०३ ते ०४ वर्षापासून प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातुन आपण गावागावांमध्ये दुष्काळात पाण्याचे टँकर, बाकडे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, नवरात्रीनिमित्त देवदर्शन यात्रा, आराधी गीत स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले असून, मराठा समाजासाठी आरक्षणाच्या चळवळीत काम केले. मराठा ओबीसी समाजाला इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती, वस्तीगृह भत्ता मिळवून देण्याचे काम केले. मराठा समाजाबरोबरही बहुजन समाजाचा आपणास पाठिंबा आहे . मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या संमतीनुसार आपण माघार न घेता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले.
आपण जरी अपक्ष निवडणूक लढवत असलो तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी रिधोरे येथील शेतकरी मेळाव्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी जाहीर केली होती. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे बोलणे चालू असून, तिसऱ्या आघाडी मार्फत पुरस्कृत निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा प्रस्ताव असून, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, स्वराज संघटनेचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आघाडीच्या वतीनेही निवडणूक लढवण्याचा विचार सध्या असून त्यांच्या सहमतीने आपण निवडणूक लढवणार आहोत. सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित सुशिक्षित जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून जनतेच्या कल्याणासाठी ही निवडणूक लढवणार असून अपक्ष म्हणून रिक्षा चिन्ह मिळाले असून या चिन्हाचे बटन दाबून करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्याची संधी मला द्यावी. दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करणार असल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.