प्रा. रामदास झोळ यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश

करमाळा (दि.६): दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ हे उद्या, दिनांक ८ जुलै रोजी मुंबई येथील भाजप कार्यालयामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रा. झोळ यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून देखील याबाबत पोस्ट करून या बातमीला दुजारा देण्यात आला आहे.

त्यांच्या सोबत अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये निश्चितच मोठा बदल घडेल, अशी चर्चा आहे.

प्रा. झोळ यांनी 2024 मधील करमाळा विधानसभा निवडणुक स्वबळावर कोणत्याही पक्षाचा आधार नसतानाही जिद्दीने लढवली होती. आदिनाथच्या निवडणुकीत देखील झोळ गटाचा स्वतंत्र पॅनेल उभारत निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी देखील त्यांनी पुढील राजकारणाची समीकरणे आखून वाटचाल सुरु ठेवली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील ते झोळ गटाला घेऊन उतरण्याची शक्यता आहे.

प्रा. झोळ यांनी तालुक्यातील विविध आंदोलने, पाणी, रस्ते, नागरिकांचे प्रश्न व अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवत जनमानसात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिक बळ मिळण्यासाठी अधिकृत पक्षाच्या झेंड्याची गरज असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले. याचबरोबर भाजपकडून पाठबळ मिळाल्यास विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची देखील त्यांना संधी मिळू शकते.




