जिद्द आणि प्रयत्नाच्या जोरावर अल्पावधीत प्रगती..

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अडचणी असतातच, अशा अडचणीवर जो माणूस मात करतो आणि कामात सातत्य ठेवतो, असाच माणूस जीवनात यशस्वी होतो. याचे उदाहरण म्हणजे पोथरे येथील रमेश गोकुळ आमटे यांचे आहे.
रमेश आमटे यांचे शिक्षण फक्त दहावी पर्यंत झाले आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या प्रगतीसाठी मोटारसायकल गॅरेजवर काम सुरू केले. आपले चुलतबंधू बाळासाहेब आमटे यांच्याकडे जवळपास दहा वर्षे काम केले. एका बाजूला गॅरेजचे काम, दुसऱ्या बाजूला घरची शेती आणि फावल्यावेळेत मिळेल ते काम असं करत त्यांनी आपली प्रगती केली आहे. याकामी त्यांचे वडील गोकुळ आमटे व आई हौसाबाई आमटे यांचे मोठे पाठबळ मिळाले आहे.
काम करत असताना वडिलांनी शेतीवर लक्ष दिले. त्याला रमण यांनी पाठबळ दिले. वडील आणि चुलत्यांनी एकत्रात जवळपास २२ एकर जमीन खरेदी केली. पुढे स्वतंत्र निघाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले. शेतीमध्येलिंबोणी लागवड केली असून, सध्या त्यांच्याकडे ७०० लिंबोणीची झाडे आहेत. त्यातून वर्षाकाठी लाखो रूपयाचे उत्पन्न मिळते. छोटा भाऊ चंद्रकांत यास उभा करण्यासाठी रमेश आमटे यांनी पाठबळ दिले. त्यातूनच चंद्रकांत इंजिनियर झाले आणि सध्या पुणे येथे जॉब करत आहेत. रमेश आमटे, चंद्रकांत आमटे या बंधूनी पुणे मध्ये जागा घेऊन तेथे इमारतही बांधली आहे. पुणे सारख्या परिसरात खुली जागा घेणं, इमारत बांधणं आणखीन जागा घेणं हे सोपं नाही. तरीही आमटे बंधूनी हे यश मिळवले आहे. दुसऱ्या बाजूला रमेश आमटे व कांतीलाल झिंजाडे या दोघांनी मिळून वॉटर प्लॅन्ट टाकला आहे. पोथरे सारख्या ग्रामीण भागात हा प्लॅन्ट टाकून ग्रामस्थांची तर सोय केलीच, पण व्यवसाय म्हणून या दोघांनी या व्यवसायात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. याशिवाय अन्य व्यवसायाच्या दृष्टीने रमेश आमटे हे प्रयत्नशील आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रमेश आमटे हे गावातील शिवजयंती, गणेशोत्सव व धार्मिक कार्यात तनमनधनाने सक्रिय राहतात. एवढेच नाहीतर गावातील शाळेतील मुलांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे म्हणून दररोज स्वत: मोफत जारचे पाणी पुरवतात.
माझे शिक्षण कमी झाल्याने मी माझ्या छोट्या भावाच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. विशेष म्हणजे माझा लहान भाऊ चंद्रकांत हा अतिशय हूशार असून तो इंजिनियर होवून पुणे येथे स्थिर होवून त्याने स्थावरही निर्माण केली आहे. त्याकामी त्याला आवश्यक तिथे मदत करण्याचं काम केलं आहे. माझ्या प्रगतीमध्ये माझे आई-वडील, माझी पत्नी पुनम, माझा भाऊ चंद्रकांत, भावजय आरती तसेच माझे मित्र कांतीलाल झिंजाडे तसेच माझे चुलतभाऊ बाळासाहेब आमटे यांचा सहभाग आहे. …रमेश आमटे
