सोनई येथील तरुणावरील हल्ल्याचा करमाळ्यात निषेध – आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

करमाळा: सोनई (ता. नेवासा) येथे मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला करून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी करमाळा येथील मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी संघटनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या:
- आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करावी.
- घटनेत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
- पीडित वैरागर कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे.


काय आहे घटना?
सोनई पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, सोनई येथील अंदाजे १५ ते २० गुंडांनी संजय वैरागर या तरुणाला गावातून जबरदस्तीने उचलून नेले. अज्ञात स्थळी नेत त्याला अमानवी मारहाण करण्यात आली. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठली:
मोटारसायकलने चिरडले: तरुणाचे हात-पाय मोडण्यासाठी त्याच्या शरीरावरून मोटारसायकल चालवण्यात आली. यात त्याचे हात-पाय गंभीररित्या फ्रॅक्चर झाले आहेत.
कायमस्वरूपी अपंगत्व: या भीषण मारहाणीत संजय वैरागरचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला आहे.
अमानुष वागणूक: मारहाणीनंतर आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका केली आणि त्याला गंभीर अवस्थेत फेकून दिले.
सोनई पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात ॲट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेला संजय नितीन वैरागर सध्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे.




