आमदार लोणीकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा केम मध्ये ‘जोडो मारो’ आंदोलन करून निषेध

केम (संजय जाधव): जालना जिल्ह्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील केम गावात प्रहार संघटना आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात प्रहार जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर, एपी ग्रुप संस्थापक अच्युत काका पाटील, उपसरपंच सागर कुरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ, गोरख काका पारखे, शरद वायभासे, विष्णू तात्या अवघडे, युवा नेते दादासाहेब पारखे, किरण तात्या तळेकर, सौदागर बिचीतकर, पिनू तळेकर, सुरेश गुटाळ, अविनाश कुलकर्णी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त वक्तव्य व स्पष्टीकरण
जालना जिल्ह्यातील परतूर इथं सोलर योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बबनराव लोणीकर यांनी भाषण करताना म्हणाले की, ‘कुचरवट्यावर बसलेली काही कार्टी सोशल मीडियावर ट्रोल करतात, त्यांच्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट, हातातील मोबाईल, चप्पलसुद्धा सरकारमुळेच आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री, आ. बबनराव लोणीकर यांनी केले.
या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे वक्तव्य चुकीचे असून लोणीकर यांना समज देणार असल्याचे सांगितले. लोणीकर यांनी आपल्या वक्तव्याबाबत सारवासारव करत सदर वक्तव्य हे सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या काही युवकांना उद्देशून केले होते. माझ्यात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही असे स्पष्टीकरण केले.






