न्यूनगंड बाजूला ठेवून वास्तव आयुष्याला भिडा : प्रा.डॉ.संजय चौधरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : प्रचंड क्षमता आणि कष्ट करण्याची वृत्ती अंगी असतानाही केवळ न्यूनगंड बाळगल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी यशापासून दूर राहतात त्यामुळे युवक युवतींनो न्यूनगंड बाजूला ठेवून वास्तव आयुष्याला भिडा. अंधश्रद्धा न बाळगता प्रयत्नवादाची कास धरा. वाचन, चिंतन आणि सूक्ष्म निरीक्षणाने सद्सद् विवेक वाढीस लागतो म्हणून पुस्तकांशी मैत्री करा असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी पोथरे येथे बोलताना केले.

पोथरे ता.करमाळा येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीरामध्ये ‘सक्षम भारतासाठी युवकांचे योगदान’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामध्ये डॉ.चौधरी बोलत होते. यावेळी पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आपल्या विद्यार्थी जीवनातील अनेक रंजक आठवणींना उजाळा देवून प्रा.चौधरी यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींचे प्रबोधन केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी डॉ. अभिमन्यू माने यांनी प्रास्तविक करून डॉ.संजय चौधरी यांचा परिचय करून दिला. सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा.सुधीर मुळीक व प्रा.कृष्णा कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रा.विजया गायकवाड यांनी आभार मानले. प्रा.डॉ.उत्तम विटूकडे, प्रा.ऋषी माने, प्रा.दिपक सोनवणे व प्रा.नागसेन ढावरे या प्राध्यापकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
