केम आरोग्य केंद्राचा प्रश्न गंभीर : डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला उपचारासाठी जावे लागले सोलापूरला
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – काल ८ मे रोजी कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी केम प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेल्या व्यक्तीला डॉक्टर उपस्थित नसल्याने सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास जाण्याची वेळ आली. या प्रकारानंतर केम येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
केम येथील बाळासाहेब बब्रुवान तळेकर (वय ५६) यांना सोमवारी ८ मे रोजी दुपारी कुत्र्याने हाताला चावले. यानंतर त्वरित समीर तळेकर यांनी कुत्रा चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन घेण्यासाठी केम प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले परंतु या ठिकाणी त्यावेळी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना खाजगी गाडी करून सोलापूर ला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागले.
केम आरोग्य केंद्रात केमसह आसपासच्या गावातून लोक उपचारास येतात. या आरोग्य केंद्रात गेले दोन महिने झाले कायम स्वरूपी डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ वर्षांताई चव्हाण यांनी या आरोग्य केंद्रास दहा दिवसांच्या आत जरडॉक्टरांची नेमणूक न केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकू असा इशारा दिला होता. याची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टरांची नेमणूक केली आहे. परंतु तरी देखील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे हा प्रसंग ओढवला असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.
केम आरोग्य केंद्रात कायम स्वरूपी डॉक्टर उपलब्ध नाहीत. तात्पुरते नेमणूक केलेल्या वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांचा इथे मनमानी कारभार सुरू आहे. हे सर्व सुरळीत होऊन लोकांची गैरसोय होणार नाही याची संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी.
–समीर तळेकर, केम
याबाबत करमाळा तालुका आरोग्य अधिकारी सौ. बोंडवले यांच्याकडे प्रतिनिधीने विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मे रोजी डॉक्टर उपस्थित नव्हते ही बाब गंभीर असून, याची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.