राजची मृत्यूशी ७२ तासांची झुंज अपयशी ठरली!

केम(संजय जाधव) : मूळचे केम येथील व सध्या उरुळी देवाची येथे वास्तव्यास असलेल्या रामचंद्र पांडुरंग मोरे यांचा अडीच वर्षांचा मुलगा राज मोरे याचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राज मोरे यास १५ मे रोजी ऊरळी देवाची (जि. पुणे) येथे खेळताना चेंबरमध्ये हात घालण्याच्या प्रयत्नात घोणस या विषारी सापाने दंश केला होता. त्यानंतर त्याला तत्काळ पुण्यातील नोबेल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तब्बल ७२ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, सोमवारी दि. १९ मे रोजी सकाळी १० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर केम व देवाची ऊरळी परिसरात शोककळा पसरली आहे. मोरे यांची बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लहानग्या राजच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर केमसह विविध ठिकाणच्या दानशूर व्यक्तींनी मदत केली होती. त्याचबरोबर राज उपचार घेऊन बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती, मात्र नियतीपुढे कोणाचे काहीही चालले नाही. राजच्या निधनाने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोरे यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या लहान बाळाला जीवदान मिळाले पाहिजे या अनुषंगाने माझ्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केमसह, महाराष्ट्रातील विविध व्हाट्सअप ग्रुपला व वैयक्तिक काही समाजसेवक लोकांना मदतीचे आवाहन करणारा मेसेज केला. त्यानंतर अनेकांनी स्वखुशीने “फुल न फुलांची पाकळी” म्हणून उपचारासाठी निधी दिला.
एवढे करून देखील बाळाचं जीव वाचू शकला नाही याची मोठी खंत सर्वांना आहे. त्यानंतर हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये काही रकमेमध्ये पेंडिंग बिल होते. लोकनेते बच्चुभाऊ कडू यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी लगेच हॉस्पिटल प्रशासनाला कॉल करून त्यांच्याकडून बिल घेऊ नका हे सांगितले. बच्चुभाऊ कडू,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन, मंगेश चिवटे यांच्या पत्रानुसार उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
● संदीप तळेकर,केम,ता.करमाळा
संबंधित बातमी : सर्प दंश झालेल्या अडीच वर्षांच्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज



