रावगाव ३३ केव्ही उपकेंद्राच्या रखडलेल्या कामावर स्वाभिमानीची दखल – राजू शेट्टी यांचा थेट इशारा..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील रावगाव येथे उभारण्यात येत असलेल्या ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. शेतीसाठी आवश्यक असलेला नियमित व दर्जेदार वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे पिकांचे नुकसान, पाणीपुरवठ्याच्या अडचणी तसेच आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र होते.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे राष्ट्रीय नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालत बारामती येथील महावितरणचे मुख्य अभियंता (सीई) पेटकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. रावगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कामात जाणूनबुजून दिरंगाई होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राजू शेट्टी यांनी, “जर हे काम तात्काळ पूर्ण झाले नाही, तर मी स्वतः रावगाव येथे येऊन स्वाभिमानी पद्धतीने आंदोलन करेन,” असा ठाम इशारा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर मुख्य अभियंता पेटकर यांनी सदर उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रावगाव व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी रावगाव परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन यापूर्वी अनेक वेळा आंदोलन व आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने अखेर राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून या रखडलेल्या कामाबाबत तक्रार करण्यात आली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी तात्काळ दखल घेतल्याने प्रशासन हालचालींना वेग आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे रखडलेल्या विकासकामांबाबत संघटनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते, याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
