आनंद आणि सामाजिक बांधिलकी यांचे नाते जपा – ताकमोगे

करमाळा (सं.प्र.) : “आपल्याला मिळणारा आनंद इतरांसोबत वाटून घेतला, तरच जीवन सर्वार्थाने आनंदी होते. त्यामुळे प्रत्येकाने सतत आनंदी राहण्याचा संकल्प करावा,” असे प्रतिपादन यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देविदास ताकमोगे यांनी केले.

साडे येथील माध्यमिक विद्यालयात त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त गोकुळबापू पाटील होते. यावेळी मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. तसेच साडे जिल्हा परिषद शाळा व श्री समर्थ वारकरी संस्थेतील मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

समारंभात आवटे सर यांच्या हस्ते ताकमोगे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संचालक भाऊराव माने, इन्शुरन्स टेक हबचे संचालक निळकंठ ताकमोगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले तर आभार प्रविण आवटे यांनी मानले. या वेळी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




 
                       
                      