सोलर पंप योजनेसाठी शेतकऱ्यांकडून खर्च घेतल्यास थेट तक्रार करा – संजय घोलप

करमाळा(दि. ८) राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सौर पंप बसविण्यासाठी सबसिडीच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, योजना राबविताना संबंधित कंपनीच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना सोलर बसविण्यासाठी खड्डे खोदणे, फाउंडेशनसाठी सिमेंट, वाळू, वीट इत्यादी साहित्य स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून देण्याची मागणी होत असून शेतकऱ्यांनी कोणताही खर्च करू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोलर बसविण्यासाठी खड्डे खोदणे किंवा फाउंडेशनसाठी लागणारा सर्व खर्च संबंधित ठेकेदारानेच करायचा, असा नियम आहे. महावितरण अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, कोणताही खर्च शेतकऱ्यांकडून घेता येत नाही. ठेकेदाराने केलेला सर्व खर्च कंपनीच्या जबाबदारीत मोडतो. शेतकऱ्यांकडून खर्चाची मागणी झाल्यास त्यांनी त्वरित महावितरण कार्यालयात किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.




