करमाळा शहरातील वीर चौकातील खोदलेल्या गटारीमुळे ४-५ दिवसांपासून रस्ता बंद – नागरिकांचे होताहेत हाल..!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील वेताळ पेठजवळील वीर चौकात गटार दुरुस्ती करण्याच्यानिमित्ताने नगरपरिषदेच्या बांधकाम ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी जवळपास ४-५ दिवस झाले खोदून ठेवल्या आहेत, अद्याप कोणतेही काम केले नसल्याने नागरिकांना येथून प्रवास करणे कठीण झाले आहे. यासंदर्भात गटार बांधकाम तातडीने करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा; अन्यथा सबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकड़े केली आहे.
किल्लावेस ते फुलसौंदर चौक व खडकपुरा ते दगडी रोडकडे वाहतुक करणारा हा रस्ता गेल्या ४-५ दिवसापासुन वाहतुकीसाठी बंद केला असून, सदर ठेकेदाराने गटार बांधकामासाठी रस्ता खोदुन ठेवला आहे. या भागात हाकेच्या अंतरावर सेन्ट्रल मुलांची शाळा तसेच श्री, कमलादेवी कन्या प्रशाला,किल्ला वेस शेजारील मुलींची शाळा असुन या ठिकाणी पहिली ते चौथी चे लहान विद्यार्थी जा-ये करतात, परंतु रस्ता बंद असल्यामुळे अनेक नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना कुंकू गल्ली किंवा मोहल्ला गल्लीतुन यावे लागते तर काही विद्यार्थी सदर खोदलेल्या खड्यात उतरून शाळेत येताना दिसत आहेत, त्यामुळे सदर गटारीचे काम तातडीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी केली आहे.