आरक्षणासाठी धनगर समाजाच्यावतीने करमाळ्यात झाले ‘रास्ता रोको आंदोलन’

करमाळा (दि.२३) – राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (S.T.) मधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपूर व लातूर येथे उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता करमाळा येथील मौलालीमाळ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घुगे व मंडल अधिकारी राजेंद्र राऊत यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी धनगर समाजाचे शेकडो समाजबांधव उपस्थित होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

धनगर समाजाच्या सर्व बांधवांनी आरक्षणासाठी एकत्र आले पाहिजे मराठा समाजाची आरक्षणा बाबत जशी एकी आहे तशी एकी आपण ठेवली पाहिजे असे मत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना उद्देशून व्यक्त केले.








