करमाळ्यात धनगर समाजाचा रास्ता रोको

करमाळा(दि.३):– धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे यांनी १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू होते. काल त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी करमाळा शहरातील मौलालीचा माळ, बायपास चौक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ मध्ये Dhangad (धनगड) ऐवजी Dhangar (धनगर) असे दुरुस्ती आदेश (जीआर) तात्काळ काढावेत. हा मुद्दा संसदेत नेण्याची गरज नसून राज्यपालांच्या परवानगीने महाराष्ट्र सरकारला जीआर जारी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असून त्यांच्यावर काही विपरीत प्रसंग ओढवला तर त्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा आंदोलनादरम्यान देण्यात आला. उपोषण दडपण्यासाठी सरकार जबरदस्ती, लबाडी किंवा चालढकल धोरण अवलंबत असल्यास धनगर समाज महाराष्ट्रासह राज्याबाहेरही तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला.


या प्रसंगी प्रा. शिवाजी बंडगर, अंकुश शिंदे, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, हनुमंत मांढरे, आण्णा सुपनर, बिभीषण खरात, चंद्रकांत देशमुख, दत्ता लफडे, दत्तात्रय यादव, संदीप मारकड, तात्या काळे, अशोक शेळके, सुशील नरूटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनावेळी विशेष कार्यकारी दंडाधिकारी भाऊसाहेब पांडेकर यांनी निवेदन स्वीकारले. पोलिस निरीक्षक रणजित माने व बिभीषण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब टकले यांनी केले तर आभार प्रविण होगले यांनी मानले.
धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात सुरू केलेले आमरण उपोषण आज १७व्या (३ ऑक्टोबर) दिवशी मागे घेतले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने आणि समाज बांधवांच्या आग्रहामुळे त्यांनी उपोषण सोडले.

