मकाई सहकारी साखर कारखान्याचा रोलर पूजन कार्यक्रम संपन्न – ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

करमाळा (दि. १६) : करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ सुरू करण्याच्या दृष्टीने १५ ऑगस्ट रोजी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कारखान्याचे चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक स्व. दिगंबरराव बागल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून मयत कामगारांच्या वारसांना थकित रकमेचे धनादेश वाटप, “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना तिरंगा वाटप तसेच प्रशासकीय कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी मशिनरीची दुरुस्ती व देखभाल पूर्णत्वाकडे आहे. ऊस तोडणी व वाहतूक कराराची प्रक्रिया पूर्ण झाली असून यावर्षी ४ ते ४.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस श्री मकाई कारखान्याकडे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन लवकरच अदा केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना कारखान्याचे अडचणीचे दिवस संपल्याचे सांगितले. पुढील काळ हा सुवर्णकाळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी बरडे यांनी केले.


