'शेटफळ'च्या गुंड परिवाराच्या लग्नपत्रिका असलेल्या 'रुमाला'ची सर्वत्र चर्चा.. - Saptahik Sandesh

‘शेटफळ’च्या गुंड परिवाराच्या लग्नपत्रिका असलेल्या ‘रुमाला’ची सर्वत्र चर्चा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सध्या लग्न सराईचा सिझन सुरू असून, शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथील गौरव गुंड यांच्या लग्नाची रूमालावरील पर्यावरण पुरक लग्नपत्रिका लोकांचे लक्ष वेधून घेत असून, या लग्न पत्रिकेचीच चर्चा या परिसरात आहे.

आपल्या परिवारातील लग्नाची निमंत्रण पत्रिका ही इतरांपेक्षा वेगळी असावी, ती आकर्षक असावी, अशी अपेक्षा अनेकांची असते. वेगवेगळ्या आकारातील वेगवेगळ्या डिझाईनच्या पत्रिका छापण्यासाठी चढाओढ सुरू असते, यामध्ये विविध प्रकार असले तरी शेटफळ येथील आय.टी.इंजिनिअर असलेल्या गौरव श्रीराम गुंड यांनी आपल्या लग्नाची पत्रिका पांढऱ्या हात रुमालावर छापून तयार केली असून, हा रुमाल एकदा धुतल्यानंतर छापलेली सर्व अक्षरे निघून जातात व हा स्वच्छ रुमाल वापरण्यासाठीही लोकांच्या उपयोगी पडतो अशा प्रकारची आगळी वेगळी लग्नपत्रिका या परिसरातील पहिलाच प्रयोग असल्याने तो कुतूहलाचा व चर्चेचा विषय बनला आहे.


लग्नपत्रिका ही सर्वसाधारणपणे कागदावर छापून एका पाकिटात घालून त्या लोकांपर्यंत दिल्या जातात.लोक ती वाचतात काही दिवसांनी त्याची रवानगी कचऱ्याच्या टोपलीत होते, काही पत्रिका जुन्या काळातील खलीता अशा प्रकारातील असतात, त्या कापडावर छापून त्याची प्लॅस्टिक काडीवर गुंडाळी करून पाकीटात टाकून त्यावर लोकांचे नाव टाकून दिल्या जातात. अशा पत्रिकेतील प्लॅस्टिक व कागद यांचा कचरा सुद्धा एक प्रकारचा कचरा हानिकारकच आहे. अशा सर्व प्रकारच्या पत्रिकांचची रवानगी शेवटी कचऱ्यात होत असल्याने, त्या पर्यावरणाला हानिकारकच ठरतात परंतु गुंड यांनी रुमालावर छापलेली पत्रिका पाण्यामध्ये रुमाल पाण्यात बुडवून धुतल्यानंतर त्याच्यावरील अक्षरी निघून जातात आणि तो रुमाल लोकांच्या उपयोगी पडतो, त्यामुळे सध्या अशा प्रकारच्या पत्रिकेच्या वेगळेपणामुळे व उपयोगी असल्याने या लग्न पत्रिकेचे लोकांना आकर्षण वाटून चर्चेचा विषय झाला आहे.

सर्वसाधारणपणे आपण कागदावर छापलेल्या पत्रिका नंतर कचऱ्यामध्ये जातात, अशा लग्नपत्रिकांवर देवतांचे फोटो छापलेले असतात ते कचऱ्यात गेल्याने एक प्रकारे त्यांची विटंबनाच होते. ही गोष्ट माझ्या मनाला खटकत असल्यामुळे आपली पत्रिका ही इतरांपेक्षा वेगळी असावी, असे वाटत होते, हात रुमालावरील पत्रिका ही मला याच्यासाठी योग्य वाटली.यासाठी कागदाच्या चांगल्या दर्जाच्या पत्रिकांपेक्षा खर्चही फारसा जादा होत नाही. त्यामुळे हीच संकल्पना आपण वापरावी असे वाटले…. – गौरव गुंड (नवरदेव शेटफळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!