राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे काम कौतुकास्पद : सचिन वाळुंज

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अवघ्या २ वर्षांमध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांसाठी करत असलेले काम, राबवत असलेले वेगवेगळे उपक्रम ,अभ्यास सहलींचे व प्रशिक्षणाचे करत असलेले आयोजन तसेच विषमुक्त शेतीसाठी सुरू असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न व प्रयोग हे खरंच कौतुकास्पद असून या शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे भविष्य उज्वल आहे असे मत सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाळुंज यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राजे रावरंभा शेतकरी कंपनी केळी या मुख्य पिकावरती काम करत असली तरी केळी या पिकाबरोबरच तूर आणि उडीद या पिकांचे विषमुक्त उत्पादन घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, परभणी कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र सोलापूर ,मोहोळ यांच्याकडून बियाणे व बीज प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य व मित्र बुरशी खरेदी करण्यासाठी सुरू असलेली त्यांची धावपळ ही आगळीवेगळी गोष्ट आहे.केवळ नफा कमवणे हा उद्देश न ठेवता विषमुक्त उत्पादन घेणे आणि त्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करणे हे सोप्प काम नाही परंतु हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचे काम ही कंपनी करत असून याची नोंद कृषी इतिहासामध्ये निश्चितच ठेवली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वय प्रतिक गुरव यांच्या हस्ते श्री सचिन वाळुंज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस राहुल पाटील, अमर दरेकर ,कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर, हनुमंत नलवडे ,अजित काटुळे, वैभव शिंदे, विवेक जाधव, राहुल गोरे आदी उपस्थित होते.



