करमाळा नगर परिषदेतील सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात – सविता कांबळे

करमाळा (प्रवीण अवचर यांजकडून) : “सफाई कामगारांना त्वरित सुरक्षित साधने उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा आम्ही प्रभागांतील महिलांना घेऊन आंदोलन करू,” असा इशारा बागल गटाच्या माजी नगरसेविका सविता जयकुमार कांबळे यांनी करमाळा नगरपरिषदेला दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्या म्हणाल्या की, करमाळा नगर परिषदेतील सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. करमाळा नगर परिषदेतील सफाई कामगारांना केवळ हातमोजे देण्यात आले असून, त्यांना घाण आणि कचरा उचलताना कोणतीही अन्य सुरक्षित साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

“इतर नगरपरिषदेत सुविधा, करमाळा मागेच”
पुढे त्या म्हणाल्या की, या कामगारांना शहरातील रस्त्यांवर पडलेली घाण, तसेच जनावरांची व श्वानांची विष्ठा थेट हातमोज्यांच्या आधारेच उचलावी लागत असल्याने येथील कामगार त्रस्त झाले आहेत. इतर नगर परिषदांकडून कामगारांना सुरक्षित साधने दिली जात असताना करमाळा नगर परिषदेतील कामगार मात्र त्यापासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे या कामगारांना तातडीने सुरक्षित साधने उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.



