चिखलठाण नं.१ येथे स्वच्छता करून ‘संत गाडगेबाबा’ यांचा स्मृतिदिन साजरा..

चिखलठाण / संदेश प्रतिनिधी :
चिखलठाण : चिखलठाण नं.१ (ता.करमाळा) येथे सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला, चिखलठाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयाच्या वतीने राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावातील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी चिखलठाण नंबर एक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व ग्रामपंचायत कार्यालयासमोरील बाजार परिसर स्वच्छ करून एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.
या स्वच्छता मोहिमेत चिखलठाण ग्रामपंचायत चे सरपंच धनश्री गलांडे, उपसरपंच आबासाहेब मारकड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद पोळ, गौतम पवार,ग्रामपंचायत
कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप वायदंडे, इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षक सर्व उपस्थित मान्यवरांनी हातात झाडू घेऊन गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



