वांगी येथे वाळू चोरी उघड – सहा लाख पाच हजारांचा ऐवज जप्त..

करमाळा : वांगी नं. 1 परिसरात वाळू चोरीचा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी कारवाईदरम्यान तब्बल सहा लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही घटना 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री आठ वाजता घडली.

या प्रकरणी पोलीस हवालदार अजित दशरथ उबाळे यांनी तक्रार दाखल केली आहे. वांगी येथे वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी सुदर्शन हरिभाऊ कांबळे (रा. उसवत, ता. मंठा, जि. जालना, सध्या रा. वांगी नं. 1) हा ट्रॅक्टरने वाळू वाहून नेताना पकडला गेला.

तपासणीदरम्यान ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू (अंदाजे किंमत ५ हजार रुपये) आढळली. मात्र संबंधिताकडे कोणताही परवाना किंवा रॉयल्टीचे कागदपत्र नव्हते. त्यामुळे ही वाळू चोरीची असल्याचे निश्चित झाले. या कारवाईत ट्रॅक्टर (किंमत ६ लाख रुपये) व त्यावरील वाळू असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

