पोथरे येथील वीरपत्नी संगीता कांबळे यांचा रासपच्या वतीने केला सन्मान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पोथरे (ता.करमाळा) येथील वीरपत्नी संगीता भारत कांबळे यांचा कारगिल विजयी दिवसा निमित्त २६ जुलैला त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला.
या सन्माना विषयी बोलताना रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते म्हणाले की, “कारगिल विजय दिवस हा भारताच्या इतिहासातील सुवर्णांक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी घुसखोरी करून कब्जा करण्याचा प्रयत्न झाला होता. हे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर २६ जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर आपल्या देशाचा तिरंगा पुन्हा एकदा फडकावला. यामुळे दरवर्षी २६ जुलै रोजी ‘कारगिल विजयी युद्ध दिवस’ म्हणून सर्वत्र देशभर साजरा केला जातो. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि देशसेवेच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर शूरवीर जवानांची आठवण करुन देणारा हा सुवर्ण दिवस आहे.
याच कारगिल विजयी दिनी पोथरे येथील वीर पत्नी संगीताताई भारत कांबळे यांचे पती वीर सैनिक शहीद भारत कोंडींबा कांबळे रा.अमळनेर ता.पाटोदा जि बीड यांना देशसेवा करत असताना जम्मु काश्मीर या ठिकाणी १९९८ रोजी वीर मरण आले. त्या नंतर सौ.संगीताताई कांबळे, मुलगा विकी कांबळे हे पोथरे येथे वास्तव्यास आहेत.
२६ जुलै रोजी कारगिल विजयी दिनानिमित्त वीर सैनिक पत्नी संगीताताई कांबळे यांचा आज पोथरे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.”
यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सिंह ठाकूर, रासप माजी संपर्क प्रमुख दिपक कडू, सुरेश शिंदे, अजित गोसावी, बाळासाहेब टकले, विकास मेरगळ इत्यादींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
माझे पती देशसेवेत देशासाठी शहीद झाल्यामुळे आमचा आधार संपलेला आहे. शासना कडून आम्हाला पाच एकर जमिंनी वितरीत करून देतो म्हणून शब्द दिला परंतु अद्यापही आम्हाला कुठेही जमिंनी मिळालेल्या नाहीत. आमच्या व्यथा शासन दरबारी कोणीही ऐकून घेत नाहीत याची खंत वाटते. आमच्या मुलांना शासकीय सेवेत घेतले पाहिजे. तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ विना-आटी शिवाय वीर पत्नीला प्राधान्याने मिळायला हवा.
– संगीता भारत कांबळे, वीरपत्नी,पोथरे ता.करमाळा