आमसभेत विचारता न आलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे नागरीकांना द्यावीत : संजय घोलप यांची मागणी

करमाळा(दि. 4): करमाळा तालुक्याची 2024-25 सालासाठीची आमसभा दिनांक 30 जून रोजी पार पडली. या आमसभेत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची लेखी उत्तरे नागरीकांना लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी आमसभा सचिवांकडे केली आहे.

घोलप यांनी सांगितले की, अनेक प्रश्न लेखी स्वरूपात व ईमेलद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. मात्र, वेळेअभावी अनेक महत्त्वाचे प्रश्न सभेत मांडले जाऊ शकले नाहीत. तब्बल दहा वर्षांनंतर ही आमसभा भरवण्यात आली असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु अनेकांचे प्रश्न अनुत्तरितच राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

“एक महिना उलटूनही नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची लेखी उत्तरे मिळालेली नाहीत. नागरिक आतुरतेने या उत्तरांची वाट पाहत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत लेखी उत्तरे दिली नाहीत, तर आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

महसूल, पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते आणि ग्रामविकासाशी संबंधित प्रश्नांवर ठोस उत्तरांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी घोलप यांनी केली आहे.





