करमाळा-माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी सावंत यांनी भरला इच्छुक मेळाव्यात अर्ज
करमाळा (दि.१९) – मराठा समाजाला आरक्षणापासून धोका देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने मराठा समाज उतरणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर विविध मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत द्यावी असे आवाहन राज्यातील समन्वयकांकडून करण्यात आले होते.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेच्या सभागृहात पार पडल्या. करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून करमाळा येथील सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी इच्छुक मेळाव्यात अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रत्येक विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे यापुढे ही माझे काम चालूच राहणार आहे मला खात्री आहे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील मलाच उमेदवारी देतील करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज ,अठरापगड सर्व धर्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन असे सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक फारुक भाई जमादार , मराठा सेवा संघ ता, अध्यक्ष सचिन काळे , पै दादासाहेब इंदलकर व मनोज बापू राखुंडे उपस्थित होते .