बँक ऑफ इंडियाच्या वीट शाखेमार्फत जप्तीची कारवाई – थकीत कर्जदारांचे धाबे दणाणले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : वीट (ता. करमाळा) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमार्फत थकीत कर्जदारांवर जप्तीची कारवाई चालू झाली असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेमार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. बँकेच्या या जप्तीच्या कारवाईमुळे वीट बँकेच्या थकीत कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ कर्जाची रक्कम भरून सहकार्य करावे; असे आवाहन वीट शाखेचे शाखाधिकारी विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना तारण मालमत्ता विकून कर्ज वसुल करण्याचा अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारने २००२ मध्ये सरफेसी हा कायदा आणला आहे. या कायद्याचा आधार घेऊन व कायद्याच्या तरतुदी अंतर्गत बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीची मोहिम चालू केली आहे. बँक ऑफ इंडियाच्या वीट शाखेने ज्या कर्जदाराकडे थकीत कर्ज आहे, अशा कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यानुसार कोर्टात धाव घेवून न्यायालय तर्फे मिळकतीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयीन आयुक्त यांची नेमणूक केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन आयुक्तांच्या उपस्थितीत व बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस सोलापूर येथील अधिकृत अधिकारी व ऋण अधिकारी यांचे उपस्थितीत जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा घेऊन बँकेस सुपूर्त करण्यात आला आहे. थकीत कर्जदारांना वारंवार लेखी-तोंडी सांगूनही त्याची दखल न घेतल्याने व वेळेत रक्कम न भरल्याने बँकेने तारण मालमत्तेचा ताबा घेतला आहे. बँकेच्या या धडक कारवाईमुळे वीट बँकेचे थकबाकीदार कर्जदार धास्तावले आहेत. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी जादा वेळ न घालविता आपली थकबाकी भरून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे शाखाधिकारी विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
