बोरगावच्या सरपंचपदी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या हर्षाली ननवरे यांची निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील बोरगांव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आमदार शिंदे गटाच्या सौ हर्षाली विनय ननवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मावळत्या सरपंच सौ उज्वला श्रीराम भोगल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पुढील दोन वर्षांसाठी सौ ननवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी मन्हुन ठाकर भाऊसाहेब व दळवी भाऊसाहेब यांनी निवडणूकीचे काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक श्रीमती उंड़े, तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
हर्षाली ननवरे या सॉफ्टवेअर इंजिनियर असून गेल्या अकरा वर्षांमध्ये त्यांनी पुण्यातील Zensar, Nihilent, Capgemini सारख्या विविध आयटी कंपनीमध्ये काम केले आहे. त्यांचे माहेर करमाळा तालुक्यातील कंदर हे असून त्या तेथील देवडकर परिवारातील आहेत. कोरोना लॉकडाऊनपासून त्यांचे काम घरूनच सुरू असल्याने त्या गावाकडे आपले सासरी राहत आहेत. पती विनय ननवरे यांनी २०१६-२०२१ या कालावधीत बोरगावचे उपसरपंच म्हणून काम केले आहे.
आत्तापर्यंत मी माझ्या पतीच्या व कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आयटी मध्ये चांगली नोकरी करू शकले आहे. आता मला गावाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असल्याने सर्वांना सोबत घेऊन गावातील रस्ते,पाणी यासारखे मूलभूत प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर गावात व्यायाम शाळा सुरू करणे, जिल्हा परिषद शाळेची सुधारणा करणे, गावाचे सुशोभीकरण करणे, महिलांसाठी सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे, शासनाच्या विविध योजना राबविणे आदी कामे येत्या काळात करणार आहे. महिलांच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यास मी भर देणार आहे.
– हर्षाली ननवरे, नूतन सरपंच, बोरगाव
त्यांच्या निवडीनंतर ननवरे परिवाराकडून गावाला जेवण देण्यात आले. या निवड़ीबद्दल नूतन सरपंच हर्षाली ननवरे यांचे आमदार संजयमामा शिंदे , माजी आमदार जयवंतराव जगताप व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटिल यांनी अभिनंदन केले.