सचिन जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

केम(संजय जाधव): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून केम गावचे सुपुत्र सचिन मच्छिंद्र जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. त्यांनी राज्यात २५ वी रँक मिळवत हे यश संपादन केले आहे.

सचिन जाधव यांचे माध्यमिक शिक्षण श्री उत्तरेश्वर हायस्कूल, केम येथे झाले, तर पदवी शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे पूर्ण झाले. पुढील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी पुणे येथे राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला.

सचिन जाधव यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असून आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर भाऊ खाजगी कंपनीत नोकरी करतो. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
निवडीची बातमी केम गावात समजताच ग्रामस्थांनी जल्लोष साजरा करून सचिन जाधव यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाचे श्रेय सचिन जाधव यांनी आपल्या आई-वडील आणि भावाला समर्पित केले आहे.
सचिन जाधव यांनी संघर्ष करत खडतर प्रवासावर मात करत यश संपादन केले, याची प्रेरणा इतर युवकांनी घेण्यासारखी आहे.
– जयंतगिरी महाराज,श्री ऊत्तरेश्वर देवस्थान महंत, केम, ता. करमाळा

