भीषण अपघात : ट्रकच्या धडकेने महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

 करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील मांगी टोल नाका परिसरात आज (ता.13) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात कामोणे येथील रतनबाई मगन नलवडे (वय 54) या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे पती मगन रामकृष्ण नलवडे (वय 60, रा.कामोणे, ता.करमाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नलवडे पती-पत्नी हे मोटारसायकलवरून रा.कामोणेहून करमाळ्याकडे येत असताना मांगी येथील पुलावर मागून भरधाव ट्रक (क्रमांक MH-18 BH-9507) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये रतनबाई नलवडे या जागीच ठार झाल्या, तर मगन नलवडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर मोटरसायकल ट्रकखाली अडकून जवळपास 100 ते 150 फूट ओढली गेली. दरम्यान, ट्रकचालकाने घटनास्थळी ट्रक थांबवून दुसऱ्या ट्रकमधून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.






 
                       
                      