शहीद नवनाथ गात समितीचे कार्य कौतुकास्पद – ॲड.डॉ.बाबुराव हिरडे

करमाळा(ता.३) : एकवीसशे बाटली रक्त संकलन, शेकडो युवकांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन,शेकडो गुणवंताच्या पाठीवर थाप,प्रतिवर्ष ज्ञानदान व अन्नदानाचे कार्यक्रम साजरे करण्याचे काम शहीद जवान नवनाथ गात समिती करते, हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. असे मत ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांनी व्यक्त केले.
शहीद जवान नवनाथ गात यांच्या 22व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळा प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे , यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, योद्धा अकॅडमीचे कॅप्टन विलास नाईकनवरे ,संगमनेर नगर परिषद चे मुख्याधिकारी रामदास कोकरे ,आजी माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष अक्रोड शिंदे,माजी सभापती शेखर गाडे, यशवंत प्रसाद शिक्षण मंडळ सचिव देविदास ताकमोगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोकुळ बापू पाटील, दत्तकला संस्थेचे प्रा.रामदास झोळ ,जेऊर चे जनमतातील सरपंच पृथ्वीराज पाटील,ॲड.रामराजे भोसले पाटील, सुभेदार सचिन पवार, जाधव मेजर, कॉन्स्टेबल सचिन काशीद, दर्याप्पा गोडसे, सतीश कोळी, सोमनाथ भोई, उद्योजक बंटी शेठ जाधव, प्राचार्य बबलू दळवे हनुमंत भराटे. मेजर सुनील दौंडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ॲड. हिरडे म्हणाले की गेली 22 वर्ष ही स्मारक समिती निरंतर कार्य करत आहे. या समितीने तालुक्याला एक चांगला विचार दिला, चांगले कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न केला आहे .तालुक्याचे चांगल्या जडणघडणीमध्ये या समितीचा मोलाचा वाटा आहे.त्यांनी सैनिकाचा तर सन्मान केलाच पण शेतकरी, शिक्षक, महिला अशा कर्तृत्वाबार व्यंक्तीचा सन्मान केला, एवढेच नव्हेतर सैनिकांच्या परिवाराचा देखील सन्मान करण्याचे काम केलेला आहे. हे करत असताना तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्याची परंपरा त्यांनी निरंतर ठेवलेले आहे.विशेष बाब म्हणजे सदरील काम कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय अविरतपणे चालू आहे. वास्तविक पहाता जे कार्य चालू आहे त्याला शासनाने निधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या कार्याला बळकटी देणे आवश्यक आहे.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार रामदास कोकरे ,आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा पुंजाहिरा वस्ती शाळा वांगी 1, क्रीडा पुरस्कार जय हिंद जगताप ,शौर्य पुरस्कार शहिद जवान मच्छिंद्र वारे मरणोत्तर)आणि कृषी पुरस्कार हनुमंत रोकडे यांना प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर स्मृतिदिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले तसेच शहीद मातापित्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, प्रा. डॉ अश्विनी भोसले योद्धा अकॅडमीचे विलास नाईकनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारा अगोदर ह.भ. प. गहिनीनाथ महाराज खेडकर यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्त बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीने संकलीत केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक समितीचे सचिव नीलकंठ ताकमोगे यांनी केले तर आभार सचिन गात यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहिद जवान नवनाथ स्मारक समितीचे सर्व कार्यकर्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे सरस्वती विद्यालय वरकुटे, साडे हायस्कूल साडे चे विद्यार्थी, गावातील सामाजिक संघटना व वरकुटे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
आम्ही शाहिदाचा सन्मान तर करतोच पण त्याचबरोबर इतर सैनिकांचा सन्मान करतो. इतरांना प्रेरणा मिळून आपल्या सैनिकाप्रती आदर निर्माण होईल .आपल्या तालुक्यातील अनेकजण जागतिक स्तरावर जाऊन काम करणारी मंडळी आहेत. त्यांचा सन्मानही आम्ही करतो. ज्यामुळे इतरांना त्याची प्रेरणा मिळेल मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचे सारखे गुणी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या पदाचा वापर करून मिळालेल्या संधीचा उपयोग करून शहरात आमूलाग्र बदल करू शकतात. हे बघून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मात्र याच बरोबर मनामध्ये एक खंत पण आहे की आपल्या तालुक्यामधील असणारी अवस्था बघता अशा अधिकाऱ्याची आपल्या तालुक्याला नक्कीच गरज आहे.
● निळकंठ ताकमोगे, सचिव-शहिद जवान नवनाथ गात स्मारक समिती,वरकुटे






