शाहीर- प्राध्यापक-डाॅक्टर ते प्रभावी वक्ता आणि अभिनेताही... -

  शाहीर- प्राध्यापक-डाॅक्टर ते प्रभावी वक्ता आणि अभिनेताही…

0


करमाळा : स्वप्न काय असेल आणि परिपूर्ती कशात होईल हे सांगता येत नाही…याचं खरं उदाहरण म्हणजे प्रा.डॉ.संजय चौधरी यांचं…
बालपणी स्वप्न पाहिलं शाहीर व्हायचं, शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे शाहीरीचे धडे घेतले, पोवाडा गायन केलं आणि विद्यार्थीप्रिय शाहीर म्हणून नाव कमावलं. शिक्षण सुरू असताना विविध गुणदर्शन कार्यक्रमात सरांचा पोवाडा कायम असायचाच. एवढेच नाहीतर त्याकाळातील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथाकथन आणि काव्यवाचन गाजवून अनेक बक्षीसे हासील केली आहेत.


मांजरगाव सारख्या छोट्याशा खेड्यात जन्म. वडील पांडुरंग  आणि आई राहीबाई ही नावं वारकरी संप्रदायातील आराध्य दैवतांची. या दोघांची याच देवावर मोठी श्रध्दा. खरंतर दयाळू व मायाळू वारकरी दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. घरात दोन बहिणी सौ. संगिता (भोगेवाडी) व सौ.शोभा ( निमसाखर ता. इंदापूर) सर मुलगा म्हणून एकुलते एक पण लाड ही भानगड या घरात कधीच नव्हती. शेती होती पण जिरायत. अर्थातच बालपण व शिक्षण हालाखीतच गेलं;  असं आसलंतरी मनात शिक्षणांची उर्मी होती. त्यामुळे ते शिकत गेले . आई- वडीलांनी पाठबळ दिलं.



मांजरगावात प्राथमिक,राजुरीत माध्यमिक,  करमाळा येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन तर बार्शी येथे उच्चमहाविद्यालयीन  शिक्षणाचा टप्पा त्यांनी पुर्ण केला.


शिक्षणासोबतच शेती सुधारण्याची धडपडही केली.नोकरी लागली तेव्हा पहिलं काम— उजनीवरून पाईपलाईन केली.मेहनतीने शेती फुलवली, शेतातच सुंदर बंगला उभारला.परंपरेप्रमाणे वास्तुशांती न करता विचारवंतांना बोलावून गृहप्रवेश करून  वेगळा आदर्श  निर्माण केला.विद्यार्थी दशेतच सामाजिक कार्याची सुरुवात केली. गावात महात्मा गांधी विचार मंच काढला, जगद्गुरू तुकोबाराय  वाचनालय सुरू केले. एकेकाळी गावात संपूर्ण व्यसनमुक्ती राबवली होती. गावात कीर्तन प्रवचनातून जनजागृती केली.शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीचा शोध सुरू झाला.


सुरूवातीच्या काळात यशवंतराव महाविद्यालयात १९९४ ते १९९६ या काळात कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून अध्यापन केले.जेऊर येथे भारत शिक्षण प्रसारक मंडळाने सन 1995 ला भारत महाविद्यालय सुरू केले होते. तिथे कै. मु.ना.कदम व कै.गोविंदबापू पाटील यांच्या माध्यमातून संधी मिळाली. या संधीचं सोनं करत “शिक्षण हेच साधन, विद्यार्थी हेच जीवन.” हे सुत्र बाळगून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ख्याती मिळवली.
प्राध्यापक म्हणून काम करतानाच  त्यांनी त्यांचे आवडते संत तुकोबाराय यांच्यावर पीएच.डी. मिळवली.. आता ते सोलापूर विद्यापीठाचे पीएच.डीचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून सोलापूर आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्याकडे पीच.डी करत आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले.
अनेक पुरोगामी विचारधारा जोपासणाऱ्या अनेक संघटनांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत. राजुरी येथील श्री.राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक स्व.सुखदेव साखरे यांचे आपल्या जडण घडणीत मोलाचे योगदान असल्याचे ते आवर्जून सांगतात. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्यासोबत कार्य करताना त्यांच्यावर  करमाळा तालुका नारायण पाटील मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली तरीही प्रबोधन हा त्यांचा मुळपिंड असल्याने राज्यातील वेगवेगळ्या व्याख्यानमालेत आणि राज्याच्या बाहेर गुजरात , कर्नाटक येथेही त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक मित्र जोडले आहेत. प्रा.डॉ.राजेंद्र दास, डॉ. महेंद्र कदम यांच्यासारख्या गुरूंशी संबंध; तर विद्यार्थी नागराज मंजुळे यांच्याशी आपुलकीचे नाते कायमच ठेवले आहे. यासर्व वाटचालीत नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री, सैराट, घर बंदुक बिर्याणी, झुंड (हिंदी) तसेच आगामी खासाबा  अशा नामांकित चित्रपटात कलाकार म्हणून काम केले आहे. लोकमंगल फौडेशनच्या वतीने प्रेरणादायी शिक्षकांसाठी दिला जाणारा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार आणि म.फुले इतिहास परिषदेच्या वतीने दिला जाणारा म.फुले सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यासारख्या पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.


      एक तात्वीक आणि वैचारिक भूमीका घेऊन जाणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे त्यांचे व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख आहे.शिक्षण, शेती, राजकारण, उत्तम वक्तृत्व, प्रवचन, चित्रपटसृष्टी आणि सामाजिक कार्य या प्रत्येक क्षेत्रात त्यांची  प्रभावी कामगिरी आहे.
या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. मनिषा यांचंही तितकंच महत्त्वाचे योगदान  आहे. सरांच्या प्रत्येक निर्णयात साथ देणं आणि प्रपंचाची जबाबदारी उचलण हे काम सोप नसतं. ते काम सौ.मनिषा यांनी आनंदाने स्वीकारले आहे. त्यांना दोन मुले.मोठा हर्षवर्धन शिक्षण घेऊन नोकरी ऐवजी शेती व्यावसायात रमला आहे, तर लहान पृथ्वीराज बी.एस्सी.ऍग्री शिक्षण घेत आहे.



या सर्व कार्यातून प्रा. डॉ. संजय चौधरी हे केवळ व्यक्ती नाहीत तर संस्था आहेत. त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व पाहून एकच ओळ आठवते
“मेहनत, विचार आणि कर्तृत्व
यांची संगमधारा जिथे वाहते”
तिथे संजय चौधरीसारखी माणसं
समाजासाठी दीपस्तंभ बनून राहतात.”
त्यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना की..
त्यांच्या कार्याला नवी भरभराट लाभो,
त्यांच्या विचारांमुळे करमाळा तालुक्याचं भविष्य उज्वल होवो.
हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…

डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे करमाळा.मो.न.9011355389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!