शंभुराजे जगताप यांची जामीनावर मुक्तता

करमाळा(दि.१४) – करमाळा खरेदी विक्री संघाचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शंभुराजे जयवंतराव जगताप यांना बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

युवा नेते शंभुराजे जगताप हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र आहेत. २९ मार्च २०२५ रोजी मौजे बोरगाव येथे अक्षय विठ्ठल शिंदे यांच्यासह काहीजण सीना नदीपात्रातून वाळू नेत असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी शंभुराजे जगताप व इतर दोघांनी पोलिसांना ही कारवाई करण्यास विरोध केला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिस कॉन्स्टेबल अमोल शाहीजी रांदील यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर श्री. जगताप हे ५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी अॅड. भारत कट्टे यांच्या मार्फत बार्शी येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर आज(दि.१४ ऑगस्ट) त्यांना जामीन मंजूर केला आहे.
यात जगताप यांच्यावतीने अॅड. भारत कट्टे, अॅड. नवनाथ राखुंडे (करमाळा) व अॅड. गणेश जगताप (बार्शी) यांनी काम पाहिले.



