हमीभाव व मार्केट दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान रूपाने द्यावी – शंभूराजे जगताप यांची पणनमंत्र्यांकडे मागणी

करमाळा(दि.२७) : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री होत असेल तर हमीभाव व मार्केट मधील दर या दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान रूपाने भावांतर भुगतान योजनेअंतर्गत दिली जावी अशी मागणी जगताप गटाचे युवानेते तथा करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी राज्याचे पणनमंत्री ना जयकुमार रावल यांचेकडे केली आहे.
पुणे येथे बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजीत केली होती .या प्रसंगी जगताप यांनी ना. रावल यांची भेट घेवून चर्चा केली. मध्यप्रदेश सरकारने अशा प्रकारे “भावांतर भुगतान योजना” राबवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील बाजार समितीमध्ये विक्री केलेला शेतमाल व हमीभाव दर यातील फरकाची रक्कम भावांतर भुगतान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान रूपाने देऊन दिलासा द्यावा.
उदाहरणार्थ जर तुरीला हमी भाव दर ७५५० रुपये क्विंटल इतकाआहे व सध्या मार्केटमध्ये तूर ७००० रुपये क्विंटल इतक्या दराने विक्री होत असेल तर ५५० रुपये अनुदान रूपाने शासनाने शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी जगताप यांनी केली आहे. यावेळी पणनमंत्री रावल यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी तब्बल तीन दशके बाजार समितीचे सभापती पदी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.





