भाजपातील आयारामना उमेदवारी दिली तर शरद पवार गटाचा प्रचार करणार नाही
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : राष्ट्रवादीला ऊमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना अभयसिंह जगताप यांनी झंझावाती दौरे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी सह महाविकास आघाडीचा झंझावात निर्माण केला मात्र त्यांना डावलून भाजपा/रासप मधील आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नसल्याचा थेट इशाराच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी प्रसिद्ध पत्रका द्वारे दिला आहे.
भाजपाने शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडले, घड्याळ धनुष्यबाण चोरला कॉंग्रेस चे नेते फोडले यामुळे सर्व सामान्य नागरिकांत भाजपा विरोधात प्रचंड संताप असून सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शरद पवार राहुल गांधी यांच्या विचारधारेला मानणारी लाट महाराष्ट्रात निर्माण झाल्याने अनेक जण या लाटेवर स्वार होवुन स्वतःच्या पदरात खासदारकी ची माळ पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरद पवार यांच्या वाट्याला माढ्याची जागा येत असल्याने पवारांनी राष्ट्रवादीतील निष्ठावंतांना डावलून भाजपातील मोहिते-पाटील रासपाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राष्ट्रवादी अडचणीत असताना पवार साहेबांची साथ सोडणाऱ्या मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर खुद्द पवार साहेब यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा खासगीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याच बरोबर बारामतीत बेरजेचे राजकारण करण्यासाठी जानकर यांचे कार्ड चालेल यासाठी शरदचंद्र पवार गटाकडून माढा मतदारसंघातील जनतेवर जानकर यांची उमेदवारी लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मोहिते-पाटील यांच्या शब्दावर गत लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जनतेने मतं दिली, शिवसैनीकांनी मतं दिली मात्र पाच वर्षांत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर किंवा मोहिते-पाटील यांना कधीच शिवसैनिकांची आठवण आली नाही उलट मोहिते-पाटील यांनी उद्धवजी ठाकरे यांना धोका देणाऱ्यां तालुक्यातील नेत्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार साहेब यांनी अशा नेत्यांना उमेदवारी दिली तर ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक त्यांना स्विकारणार नाहीत त्यामुळे शरदचंद्र पवार यांनी पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांच्या भावना जाणून घेऊनच उमेदवारी जाहीर करावी अन्यथा भाजपा विरोधात संताप व महाविकास आघाडी बद्द्ल आपुलकी असून देखील माढा मतदारसंघातील हक्काची जागा महाविकास आघाडीला गमवावी लागेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी दिला आहे.
अधिक बोलतना फरतडे म्हणाले की महाविकास आघाडी या नात्याने आम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी एक दिलाने लढू मात्र “मागील काळात शिवसैनिकांना तसेच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करणाऱ्यांना पाठबळ देणार्यांना कसं स्विकारायचं? असा सवाल उपस्थित करून आमच्या मनातील वेदना आम्ही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांना कळवणार असल्याचे सांगितले.