५५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळावे – शिक्षक भारती संघटनेची मागणी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – २०२४ लोकसभा व विधानसभा व निवडणुकींकरता अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्ती देताना ५५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रियेतून वगळण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी करमाळा यांना निवेदनाद्वारे करण्यात केली आहे
५५ वय वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयक प्रश्न गंभीर स्वरूपाचे असतात उच्च रक्तदाब, मधुमेह, मुळव्याधी यासारख्या आजारांची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात. निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना इतर तालुक्यात जावे लागते. दोन दिवसांच्या निवासासाठी इतर तालुक्यात राहावे लागते. निवडणुकांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने या कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. निवडणूक कामातील ताण तणाव यामुळे या कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
हे निवेदन करमाळा तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आले. शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड, कोषाध्यक्ष गोरख ढेरे, सचिव सचिन गाडेकर यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. यावेळी संघटनेचे सदस्य चोरमले सर, शिंदे सर, आढाव सर, ॲडवोकेट ढेरे उपस्थित होते.