शिरसोडी ते कुगाव पुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते झाले भूमिपूजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : उजनी धरण बॅक वॉटर क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणारा पूल उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन काल दि.२३ ऑगस्ट रोजी शिरसोडी येथे पार पडले.या पुलाच्या कामासाठी ३८२ कोटी २२ लक्ष निधी मंजूर झालेला आहे.
हे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप काटकर आदीं मान्यवरांच्या उपस्थित भूमिपूजन झाले.
उजनी धरणाची निर्मिती झाल्यामुळे पाणलोट क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर करमाळा तालुक्यातील नागरिकांना इंदापूर तालुक्यात जाण्यासाठी जेऊर-टेंभुर्णी-इंदापूर असा सुमारे ७०-८० किलोमीटरचा दोन अडीच तासांचा प्रवास करावा लागत आहे. याला पर्याय म्हणजे करमाळा तालुक्यातील कुगाव,चिखलठाण येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ अशा उजनी काठावरील गावांना खाजगी बोटीद्वारा प्रवास करावा लागतो. याच बोटीतून दुचाकीची वाहतूक केली जाते. परंतु हा पर्याय सर्वांनाच सोयीस्कर नसून धोकादायक देखील आहे. त्यामुळे दोन तालुक्यातील दळणवळण सोईस्कर होण्यासाठी करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यातून मोठा पूल उभारण्याची मागणी करत होते.
तसेच ३ महिन्यांपूर्वी कुगाव ते कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडून ५ व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आमदार संजयमामा शिंदे व आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पुल बांधण्याची मागणी केली होती. आज प्रत्यक्ष या कामाचे भूमिपूजन होत असल्यामुळे करमाळा तालुक्यासाठी तसेच इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी बोलून दाखवली. या पुलाबाबत इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या पुलाचे हे असणार फायदे
- नव्याने पूल झाल्यानंतर करमाळा व इंदापूर तालुक्यातील अंतर सुमारे ८० किलोमीटर ने कमी म्हणजेच दोन अडीच तासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात दळणवळण वाढून विकासास गती मिळणार आहे.
- करमाळा तालुक्यातील नागरिकांना इंदापूर, बारामती, भिगवण येथे जाण्यासाठी अंतर कमी झाल्याने तेथील बाजारपेठ, दवाखाने, कॉलेजेस आदी सुविधा मिळविणे सोपे होणार.
- मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार
- उजनी बॅक वॉटर परिसराच्या गावातील शेतकऱ्यांना उसासाठी पर्यायी कारखाने उपलब्ध होणार, केळी व इतर भाजीपाला उत्पादकांना जेऊर-टेंभुर्णी-इंदापूर असा वळसा न घालता पुण्याकडे जाणे सोपे होणार.
- वाहतुकीची सोय उपलब्ध झाल्याने मोठ मोठे उद्योग धंदे वाढण्यास मदत होईल व रोजगार वाढणार
- उजनी बॅकवाॅटर परिसरात पर्यटनाचा विकास होऊ शकतो
- कुगाव हनुमान मंदिरास व रुई येथील बाबीर मंदिरास भाविकांना भेट देणे सोपे होणार
- उजनी बॅकवाॅटर परिसरातील बोटींग व्यवसायाला चालना मिळणार
शिरसोडी ते कुगाव पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, कुगाव येथील जगदंबा दूध संस्थेचे चेअरमन सचिन गावडे , आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, विकास सोसायटीचे चेअरमन महादेव कामटे , शाबुद्दीन सय्यद, विजय कोकरे, महादेव पोरे, कैलास बोंद्रे ,प्रकाश डोंगरे ,मंगेश बोंद्रे, शंकर बोंद्रे ,अर्जुन अवघडे आदीजण उपस्थित होते.