करमाळा नगरी शिवमय; अधिकमासानिमित्त शिव महापुराण कथा सप्ताहास आजपासून प्रारंभ.. -

करमाळा नगरी शिवमय; अधिकमासानिमित्त शिव महापुराण कथा सप्ताहास आजपासून प्रारंभ..

0

करमाळा संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.15) : पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने करमाळा शहर भक्ती, अध्यात्म आणि शिवभक्तीच्या वातावरणाने न्हाऊन निघणार असून, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व श्री संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा आज शुक्रवार १५ मे ते गुरुवार  २१ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करमाळा शहरातील एसटी कॉलनी, श्रीदेवीचामाळ रोड येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात संपन्न होणार आहे.

या कथा सप्ताहात आदरणीय कथाव्यास सुश्री स्नेहगंगाश्रीजी माई (आळंदीकर) – झी टॉकीज फेम आपल्या सुमधुर, प्रभावी आणि अभ्यासपूर्ण वाणीतून भगवान शंकरांचे चरित्र, शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचे निरूपण करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर सात दिवस शिवमय वातावरणाने भारावून जाणार असल्याची माहिती मुख्य यजमान श्रेणिक खाटेर व श्रीमती रंजना कुरलकर यांनी दिली.

अधिकमासाच्या पवित्र पर्वात आयोजित करण्यात आलेला हा कथा सप्ताह भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा, संस्कार आणि भक्तीची पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत कार्यक्रम पत्रिका प्रकाशन व मंडप पूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मुख्य यजमान श्रेणिक खाटेर, संगीता खाटेर तसेच रंजना कुरलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

बैठकीत कथा सप्ताहाचे सुयोग्य नियोजन, मंडप व्यवस्था, भाविकांसाठी सुविधा, प्रसाद वितरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी समिती सदस्यांनी जबाबदाऱ्या निश्चित करून तन-मन-धनाने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जगदीश शिगची तसेच कविता निळ आटोळे यांनी धार्मिक उपक्रम समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करत असल्याचे सांगितले. अधिकमासातील या कथा सप्ताहामुळे युवकांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि समाजात ऐक्यभाव वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनेश मुथ्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री संत गजानन महाराज भक्त परिवार व समितीच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व गणपतीची मूर्ती देऊन गौरविण्यात आले. हा सत्कार मुख्य यजमान श्रेणिक खाटेर यांच्या हस्ते करण्यात आला.

या नियोजन बैठकीस रवींद्र विद्वत, जगदीश शिगची, प्रदीप देवी, नारायण पवार, सुरेश चव्हाण, कचरूशेठ मंडालेचा, अर्जुन गंधे, गणेश बोरा, शंकर रासकर, पत्रकार दिनेश मडके, विजय साळुंखे सर, ॲड. संकेत खाटेर, वर्धमान खाटेर, गिरीश शहा, बापू शिरगिरे, वैभव दोशी यांच्यासह महिला भगिनी व भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!