शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी

करमाळा(दि. 28): पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरणाचा उपक्रम देवळाली येथे राबवण्यात आला आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे नेतृत्व शिवसेना तालुका समन्वयक राहुल कानगुडे यांनी केले.

या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेसाठी मोलाचे योगदान दिले.

प्रत्येक वारकऱ्याला गरजेप्रमाणे औषधे मोफत देण्यात आली. ज्या वारकऱ्यांना इंजेक्शन अथवा सलाईनची आवश्यकता होती, त्यांच्यासाठी स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत चिवटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सोय करण्यात आली होती. डॉक्टर ओंकार उघडे यांच्याद्वारे वारकऱ्यांची सेवा नि:शुल्क करण्यात आली.






