शिवसेना महिला आघाडीकडून करमाळा एस.टी. आगाराची पाहणी - Saptahik Sandesh

शिवसेना महिला आघाडीकडून करमाळा एस.टी. आगाराची पाहणी


करमाळा (दि.६): स्वारगेट येथील बस स्थानक येथे घडलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्याही बस स्थानकामध्ये महिलांवर गैरकृत्य होवू नये म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सुचनेनुसार राज्य परिवहन आगार भेटीसाठी सर्वेक्षण फॉर्म सोबत घेवून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आरती बसवंती व तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आज करमाळा येथील बस स्थानकामध्ये अचानक भेट दिली. यावेळी आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांच्या समवेत संपूर्ण बस स्थानकाची पाहणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आरती बसवंती व तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी करमाळा आगाराच्या दुर्दशेबाबत जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले. शासनाच्या आदेशानुसार एस.टी. स्टॅण्डवर असलेल्या महिलांच्या बेस्ट शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड मशिन व इतर सुविधा दिसून आल्या नाहीत त्याचप्रमाणे स्तनदा महिलांसाठी हिरकणी कक्ष एका आडबाजूला शासनाला दाखविण्यातपुरता फक्त नावालाचा दिसून आला त्यामध्येही कोणत्याही सुविधा नाहीत तसेच हिरकणी कक्ष म्हणून कोठेही दिशादर्शक फलक लावलेले नव्हते तसेच सदर कक्ष शिवसेनेचे पदाधिकारी आल्यामुळेच तो उघडा ठेवला होता इतर वेळी तो कक्ष बंद अवस्थेत असतो अशी तक्रारही यावेळी प्रवाशांनी शिवसेनेच्या महिला आघाडीकडे केली.
त्याचप्रमाणे विकलांग प्रवाशांसाठी सुलभ प्रवेश, रॅम्प, रेलिंग व प्रतीक्षा / विश्रामाची योग्य सुविधा आगार प्रमुखांनी करून घेणे आवश्यक असताना ही या ठिकाणी विकलांगासाठी कोणतीही सुविधा पहायला मिळाली नाही तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभावही दिसून आला.

यावेळी जिल्हाप्रमुख आरती बसवंती यांनी महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विशाखा समितीची स्थापना केली आहे का ? याबाबत विचारणा केली असता सदरची समिती सुध्दा फक्त कागदावरच तयार करण्यात आलेली सून प्रत्यक्षात तसा फलक कोठेही लावण्यात आलेला नाही. करमाळा आगाराच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर दिसून आला तर महिलांच्या शौचालयामागे घाणीचे साम्राज्य दिसून आल्याने आगार व्यवस्थापकांकडे विचारणा करताच त्यांनी नगरपरिषदेची घंटागाडी येत नसल्याचे व एस.टी.डेपोच्या बाहेर अतिक्रमण होत असून नगरपरिषद लक्ष देत नसल्याचे कारण सांगत नगरपरिषदेस जबाबदार धरले.

यापूर्वी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोऱ्यांना चाप बसावा म्हणून प्रवाशांच्या बैठक आसनाच्या मध्यभागी पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केलेला होता तो कक्षही सध्या त्या ठिकाणी नसल्याने पदाधिकाऱ्यांचा पारा अनावर झाला.

यावेळी जिल्हाप्रमुख आरती बसवंती यांनी सांगितले की, शिवसेनेच्या राज्य परिवहन आगार भेटीसाठी सर्व्हेक्षण फॉर्ममध्ये करमाळा आगाराची संपूर्ण माहिती भरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना कळविणार असून लवकरात लवकर सर्व सुविधा आगार व्यवस्थापकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात याव्यात अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी माढा तालुका प्रमुख संगिता वरपे, तालुका संघटक दिपाली वरपे, युवा सेना उपशहर प्रमुख अनिकेत यादव आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!