कार्यकारी अभियंता अकलूज यांच्या विरोधात शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन -

कार्यकारी अभियंता अकलूज यांच्या विरोधात शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

0

करमाळा(दि.१८) – करमाळा सार्वजनिक बांधकाम उपविभागातील दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या उपविभागीय लिपिक पदाची तातडीने भरती करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे 15 ऑगस्ट रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुयश कर्चे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील नागरिकांना 80-90 किलोमीटरवरून अडचणी घेऊन येऊनही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात. उपविभागीय अभियंता हे अकलूज येथील अतिरिक्त पदभार सांभाळत असल्याने करमाळा येथे नसतात. तसेच उपविभागीय लिपिकाचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

या संदर्भात अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करून दोन वरिष्ठ लिपिक उपलब्ध करून देण्यात आले तरीही कार्यकारी अभियंता अकलूज यांनी त्यांना करमाळा येथे न पाठवता अकलूजमध्येच ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून कार्यकारी अभियंता मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. उपविभागीय लिपिकाला करमाळा येथे न पाठवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष सुयश कर्चे, अमोल जाधव, पद्मजाताई इंगवले (जगताप), संतोष वारगड, नवनाथ गुंड, निलेश पोटे, रमेश लगस, श्रीकांत गोसावी, दादा थोरात, दादासाहेब तनपुरे, विलास कर्चे, अनिकेत यादव, बाळासाहेब कारंडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!