पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर करत फडकविला तिरंगा!
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये (लोणी काळभोर) कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी जगातील सर्वात उंच असलेले माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. १७ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता माउंट एवरेस्ट शिखरावर पोहोचल्यावर त्यांनी भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. त्यांच्या या कामगिरीचे कोंढेजसह करमाळा तालुक्यातुन कौतुक केले जात आहे.

नेपाळ-चीन सीमेवर असलेल्या हिमालय पर्वतातील हे शिखर 8848.86 मीटर उंचीचे आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमते बरोबरच मानसिक क्षमता देखील असणे आवश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते त्यामुळे साधारण चालताना देखील शरीराची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच नेहमी यशस्वी होतात. असाच आत्मविश्वास ठेवून शिवाजी ननवरे यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले.

शिवाजी ननवरे यांचे आईवडील शेती करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी पोलिस दलात नोकरी मिळविली. सध्या ते पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे २०१७ पासून पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. २०२१ मध्ये त्यांनी अटलबिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स, मनाली येथून त्यांनी ट्रेकिंग विषयी प्रशिक्षण घेतले आहे. माउंट एव्हरेस्टच्या मोहीमेसाठी त्यांना एव्हरेस्ट वीर भगवान चवले आणि एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव तसेच नेपाळमधील पायोनिर एडवेंचर यांचे मार्गदर्शन मिळाले. या मोहीमेसाठी त्यांना एव्हरेस्ट वीर भगवान चवले आणि एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव तसेच नेपाळमधील पायोनिर एडवेंचर यांचे मार्गदर्शन मिळाले.


पोलिस खात्यातील कामगिरी देखील उत्तम राहीली आहे.
- २०१८ साली पोलीस महासंचालक पदकाचे ते मानकरी ठरले आहेत.
- केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक मिळालेले आहे
- गडचिरोली येथे विशेष कामगिरी केल्यामुळे २०१९ मध्ये खडतर सेवा पदक मिळाले.
- ननवरे हे महाराष्ट्र पोलीस मधून चौथे एवरेस्ट वीर आहेत.
