श्रावणी सोमवारनिमित्त ऊत्तरेश्वर मंदिरात १३ तास अखंड जप, मंदिर परिसर शिवमय

केम(संजय जाधव):चौथ्या श्रावणी सोमवारी ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटनेच्या वतीने श्री ऊत्तरेश्वर मंदिरात तब्बल १३ तास “ॐ नमः शिवाय” जपाचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या जपामध्ये ग्रामस्थ, महिला तसेच श्री ऊत्तरेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली व संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी १० वाजता शिवकुमार बाळासाहेब सोलापूरे व ओंकार ऊत्तरेश्वर भक्त यांच्या वतीने तब्बल ५१ किलो खव्याने शिवलिंगाचे लेपन करण्यात आले. हे लेपन मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव, भैया मोकाशी, तात्या गुरव व शंकर देवकर यांनी केले. या उपक्रमाचे भाविकांनी विशेष कौतुक केले.


दर सोमवारीप्रमाणे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. आजचे अन्नदाते रमाकांत सोलापूरे व कांतीलाल चव्हाण यांच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. तसेच नित्यनेमानुसार संध्याकाळी मंदिरात नागवेल पानांची मखर सजावट पुजारी कृष्णा गुरव व तात्या गुरव यांनी केली. या सजावटीने आरतीसाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधले. आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.


यावेळी देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांनी सांगितले की, “श्रावण सोमवारी ‘ॐ नमः शिवाय’ जप केल्याने मनुष्याचे संकट दूर होतात, निगेटिव्ह विचार दूर होऊन सकारात्मक उर्जा प्राप्त होते.”


